लांजा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची वानवा,प्रशासन व लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष..!
―ग्रामीण स्तरावरील आरोग्यसुविधा पुरविणारे शासकीय ग्रामीण रुग्णालय आजारी; उपचारांभावी स्थानिकांचे आरोग्य धोक्यात.
ग्रामीण रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, असुविंधा तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुवे गावातील दोन जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू ही घटना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयावरील जनतेचा विश्वास कायमचाच उडवणारी.
दि. १० नोव्हेंबर, २०२२ रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास वारेशी कुटुंबियातील गर्भवती महिलेला शासकीय ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी उपचारांभावी आणि यंत्रणेतील असुविधांमुळे तसेच निर्णयातील दिरंगाईमुळे त्यांना अखेरीस पाचव्या दिवशी जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास सांगितले गेले. अशातच १०८ रुग्णवाहिकेमध्येच दोन निष्पाप जुळ्या अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून झाल्याची बातमी माध्यमातून प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर या सामाजिक संस्थेच्यावतीने सोमवार दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी रुग्णालयातील अधिकारांची भेट घेतली. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक श्री. सतीश पाटील यांच्या पत्नी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत त्यांच्याशी संवाद साधताना आरोग्य सुविधांबाबत अनेक गोष्टी समोर आल्या.
१) रुग्णालयांत अपुरे मनुष्यबळ, विविध संवर्गातील रिक्त पदे.
२) नवजात मुलांसाठी अतिदक्षता विभाग (NICU) नाही
३) कर्मचारी रुग्णालयात नाममात्र सेवेकरू म्हणून कागदी नोंद. वास्तवात कामासाठी दुसऱ्याच ठिकाणी कार्यरत आहेत.
४)अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर जास्तीचा ताण.
वरील गोष्टी सांगून डॉक्टर / अधिकारी वर्ग हात वर करीत असतील आणि राजकीय प्रतिनिधी सत्तेची समीकरणं साधत असतील तर शासन / प्रशासन / आरोग्य यंत्रणा नेमके सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधेतील कोणते औषध देताहेत? यावर एमपीव्हीएस सामाजिक संस्था जनतेचा आवाज उठविल्याशिवाय थांबणार नाही.
बातमी सौजन्य - दै. प्रहार (वर्तमानपत्र)
- मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर
Comments
Post a Comment