रिफायनरी प्रकल्पाला कोकणकरांचा कडवा विरोध....
राजापूरच्या तेल शुध्दीकरण कारखान्याला ( रिफायनरी ) कोकणातील जनतेने प्रखर विरोध केला आहे. प्रकल्पग्रस्त गावांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आणि मुंबईतील कोकणवासीयांनी आंदोलन उभे केले आहे. शुक्रवार दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत मुंबईत 'आझाद मैदान' येथे रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेने धरणे आयोजित केले होते.पृथ्वीच्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर, मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याच्या दृष्टीने, पॅरिस कराराचे पालन करण्यासाठी या लढ्यास अत्यंत महत्व आहे.
केमिकल प्लांट,रिफायनरी,अणुभट्टी यासारखे घातक पर्यावरणाला मारक प्रकल्प कोकणातच का आणले जातात यामागे राज्यकर्त यांचा कुटील डाव आहे.कोकणातील सुजलाम सुफलाम भूमी नष्ट करण्याचा पवित्रा घेऊन काही राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.या रिफायनरी प्रकल्पामुळे कित्येक लाख टन राख दररोज हवेमध्ये मिसळली जाईल त्यामुळे येथील नागरिकांना अनेक श्वसनाचे, त्वचेचे विकार होऊ शकतात.प्रदूषण वाढल्याने त्याचा फटका आंबा,काजू यासारख्या सगळ्या प्रकारच्या बागायती शेतीला होऊ शकतो.उत्पन्नाअभावी येथील कोकणी माणूस देशोधडीला लागेल.ज्या राज्यकर्त्यांनी हा प्रकल्प कोकणच्या माथी मारला आहे त्यांनी तो प्रकल्प आपल्या भागात नेऊन तिकडे रोजगार निर्माण करावेत.कोकणात अशा प्रकल्पांची काडीमात्र आवश्यकता नाही.कोकणी माणूस आता पूर्वीसारखा अडाणी राहिलेला नाही त्याचे भलेबुरे कशात आहेत ते तो आता योग्यप्रकारे समजतो.शासनाने हा प्रकल्प गुजरात किंवा नागपूर मध्ये घेऊन जाण्याची हिंमत दाखवावी.या प्रकल्पासाठी कोकणी माणूस आपली इंचभर जमीन द्यायला तयार होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.जसा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आम्ही कडाडून विरोध केला तसाच या प्रकल्पाला सुद्धा होईल. शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही निश्चितच वाया जाईल..
मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापूर) हे संघटन अशा विनाशकारी प्रकल्पाला कडाडून विरोध करते.नाणार मधील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत.
मुचकुंदी परिसर विकास संघ रिफायनरी विरोधात छेडलेल्या आझाद मैदान येथील धरणे आंदोलनात भाग घेऊन नाणार मधील जनतेला आणि कोकणवासीयांना पाठींबा दिला.याप्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री. विजय भगते सर,सचिव गणेश खानविलकर व मटकर साहेब उपस्थित होते..
मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापूर)
Comments
Post a Comment